गंगापूर येथे १६ जानेवारीला भव्य हिंदू संमेलन

Foto
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रमुख मार्गदर्शन 

महाराष्ट्रातील गंगापूर, संभाजीनगर जिल्ह्यात प्रथमच गंगापूर शहरात येत्या शुक्रवारी (दि. १६) रोजी ऐतिहासिक व भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि राष्ट्रबांधणीचा संदेश देणारे हे संमेलन गंगापूर शहरात मोठ्या उत्साहात पार पडणार असून, शहरासह तालुक्यात वातावरण भारावून गेले आहे. डॉ. मोहन भागवत यांनी यापूर्वी विविध मंचांवरून कुटुंब व्यवस्था, सामाजिक समरसता, पर्यावरण रक्षण, नागरिक शिस्त आणि राष्ट्रप्रेम या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले आहे. त्याच विचारांची पुढील दिशा या गंगापूरमधील हिंदू संमेलनातून मिळणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्रात प्रथमच गंगापूर येथे कार्यक्रम होत आहे. 

या संमेलनाला ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान), ह. भ. प. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज (गोदावरी धाम, सराला बेट), जगद्गुरु श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज, ह. भ. प. गुरुवर्य नाथगिरी रामभाऊ महाराज यांच्या सान्निध्याचा लाभ मिळणार आहे. संत महंतांच्या मार्गदर्शनातून हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे जतन व संवर्धन यावर सखोल विचार मांडले जाणार आहेत.

संमेलनाचा व्यापक सामाजिक संदेश : 
या हिंदू संमेलनातून जात, भाषा, प्रदेश व आर्थिक स्थितीवर आधारित भेदभाव न करता सर्वांना आपले मानण्याचा स्पष्ट संदेश दिला जाणार आहे. मंदिरे, सार्वजनिक सुविधा, जलस्रोत व स्मशानभूमी या सर्व हिंदूंकरिता खुल्या असाव्यात, हा विचार ठामपणे मांडण्यात येणार आहे. सामाजिक कार्य हे संघर्षासाठी नसून एकतेसाठी असते, ही भूमिका या मंचावरून अधोरेखित होणार आहे.

पर्यावरण व नागरिक कर्तव्यांवर भर : 
डॉ. मोहनजी भागवत यांच्या मार्गदर्शनातून पर्यावरण रक्षण, पाणी बचत, वृक्षारोपण, स्वदेशीचा आग्रह, मातृभाषेचा वापर तसेच संविधानिक मूल्यांचे पालन यांसारख्या विषयांवर समाजाला दिशा मिळणार आहे. कुटुंब, समाज व राष्ट्र यांचा परस्पर संबंध समजून घेत प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी, हा या संमेलनाचा मुख्य संदेश असणार आहे.

संघ स्वयंसेवकांची जोमदार तयारी : 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गंगापूर शहरातील स्वयंसेवकांनी या संमेलनासाठी संघटित, नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी सुरू केली आहे. कार्यक्रमस्थळाची आखणी, शिस्त व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, नागरिकांसाठी सुविधा, स्वयंसेवकांचे नियोजन अशा प्रत्येक बाबीवर काटेकोर लक्ष दिले जात आहे.
संघाच्या शाखा, कार्यकर्ते तसेच विविध हिंदू संघटनांचा या संमेलनाला सक्रिय पाठिंबा मिळत असून, हे संमेलन केवळ कार्यक्रम न राहता हिंदू समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. 

डॉ. मोहन भागवत यांची उपस्थिती व संत महंतांचे मार्गदर्शन लाभणारे हे हिंदू संमेलन गंगापूर शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू संमेलन समिती, गंगापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.